Tuesday, June 1, 2010

शिवराज्याभिषेक होणारच ???

पुरातत्व खात्यास प्रतापगडाखालील पुरलेल्या अफझलखानाच्या कोथळयाची जेवढी काळजी आहे तेवढी किल्ले रायगडाची नाही. आता तर गडावर शिवराज्याभिषेक सोहळयास परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी बंदी घालण्यास ही काय मोगलाई आहे का? पुरातत्व खात्यास रायगडाच्या पायथ्याशी पुरून आमही शिवराज्याभिषेक दिन साजरा करू अशी गर्जना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे.

'सामना'च्या अग्रलेखातून आपली भूमिका मांडताना बाळासाहेब म्हणतात, रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळयास परवानगी नाकारणे हा शिवरायांचा अपमान आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या खिजगणतीत तरी हे आहे काय? विधान परिषद निवडणुकीत 'चौथा' उमेदवार जिंकेल काय या लढाईत काँग्रेसवाले अडकले आहेत आणि राज्यसभेत तारीक अन्वर, ईश्वरलाल जैन यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने घोडेबाजार मांडला आहे. या लढाईत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक मात्र बंदीहुकमात अडकला आहे. किल्ले रायगडावर रणकंदन व्हावे अशी कुणा सरकारी बाबूरावांची इच्छा असेल तर शिवसेना 'हर हर महादेव' करण्यास तयार आहे.

ज्या कुणी पुरातत्व खात्यातील बाबूरावांनी शिवराज्याभिषेक सोहळयास मनाई केली त्या पुरातत्व खात्यास रायगडाच्या पायथ्याशी पुरून शिवराज्याभिषेक दिन सोहळा आम्ही साजरा करू. चारही बाजूंनी मोगली राजवटीने घेरले असतानाही छत्रपती शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक केला. एकही मोगल बादशहा हा सोहळा रोखू शकला नाही. मग हे सध्याचे पुरातत्ववाले कोण? असा प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी विचारला आहे.

बाळासाहेब पुढे म्हणतात की, किल्ले रायगड हीच महाराष्ट्राच्या शौर्याची खूण व अस्मिता आहे. गडावर शिवप्रेमींचे अनेक उपक्रम व सोहळे साजरे होत असतात. त्यातला एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य बळकट करण्यासाठी ६ जून १६७४ मध्ये स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला. या प्रेरणादायी दिवसाची स्मृती अखंड राहावी यासाठी गेली कित्येक वर्षे रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. हजारोंच्या संख्येने तेथे शिवप्रेमी जनता जमते. गेल्या वर्षी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी स्वत: जाहीर केले की, ६ जून २०१० पासून हा सोहळा शासकीय सोहळा म्हणून साजरा होईल. त्याची जय्यत तयारी सुरू असतानाच केंद्राच्या पुरातत्व खात्याने शिवराज्याभिषेक दिन सोहळयावरच बंदी आणली. तरी मुख्यमंत्री गप्प का?

पुरातत्व खाते हे आपल्या देशातील एक बकवास व बिनकामाचे खाते बनले आहे. निदान महाराष्ट्रापुरते बोलायचे तर या खात्याने मराठी शौर्याचा इतिहास मारण्याचेच काम केले. सिंधुदुर्ग किल्ल्यावर भगवा झेंडा लावायलाही विरोध करणारे हे पुरातत्व खाते. शिवरायांच्या पराक्रमी किल्ल्यांवर भगवा झेंडा लावायचा नाही तर काय औरंगजेब, अफझलखानाचा 'चांदा-तारा' असलेला हिरवा झेंडा लावायचा? अशा शब्दात त्यांनी पुरातत्व खात्यावर ताशेरे ओढले आहेत.

शिवकालीन किल्ले हे आपल्या देशाचे भूषण आहेत व ते जतन केले पाहिजेत. इतर राज्यांतील संस्थानिक व राजे - महाराजांनी त्यांच्या अय्याशीसाठी भव्य राजवाडे व महाल उभे केले, पण शिवरायांनी मोगलांशी लढण्यासाठी डोंगरी किल्ले निर्माण केले. जलदुर्गांची बांधणी केली. महाराष्ट्राइतके किल्ले आणि त्यातल्या त्यात डोंगरी किल्ले जगातल्या कोणत्याही प्रदेशात नाहीत. तरीही महाराष्ट्रातील एकाही गडकोटाची स्थिती चांगली नाही.

या सर्व ऐतिहासिक किल्ल्यांचा ताबा पुराणवास्तू म्हणजे पुरातत्व खात्याकडे आहे. अर्थात पुरातत्व खाते कसे नसावे याचा जर जगात कोणाला अभ्यास करायचा असेल तर त्याने हिंदुस्थानात यावे. मुळात या पुरातत्व खात्याची अवस्थाच वैराण स्मशानासारखी झाली आहे तेथे हे लोक गड व त्यांच्या इतिहासाचे काय कल्याण करणार? अशी चिंता त्यांनी व्यक्त केलीय.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १८८५ साली स्थापन झालेल्या 'श्री शिवाजी रायगड स्मारक संस्थे'ने गडावरील वास्तूचे जतन व्हावे यासाठी तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे रायगडावरील सध्याचे भग्न अवशेष तरी दिसत आहेत. दिल्लीतील 'यमुना' तिरी गांधी, नेहरू, राजीव, संजीव, देवीलालपासून चरणसिंगांपर्यंत सगळयाच राजकारण्यांच्या स्मशान समाध्या 'स्मारके' म्हणून उभी राहिली. नेत्यांच्या राहत्या घरांची दिल्लीत स्मारके बनवून कोटयवधी रुपये खर्च होत आहेत. पण शिवरायांचा रायगड हा कायम उपेक्षितच राहिला, असे मत सेनाप्रमुखांनी व्यक्त केलंय.

सन १८८५ मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल हे रेव्हेन्यू कमिशनर मिस्टर क्रॉफर्ड, डॉ. वॉटर्स व कॅ. पिट यांच्यासमवेत रायगडावर गेले होते. किल्ला पाहून परत गेल्यानंतर त्यांनी कलेक्टरला 'तुमच्या जिल्ह्यात असलेल्या या इतिहासप्रसिध्द स्थळांच्या दुरुस्तीकडे आणि समाधीकडे लक्ष का पुरविले नाही?' असा जाब विचारणारे पत्र लिहिले. हिंदुस्थानचे पहिले स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपती हे महाराष्ट्रातच जन्माला यावे हे आपले भाग्यच होय. त्या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा रायगडावर नाही साजरा करायचा तर काय दिल्लीच्या जामा मशिदीत साजरा करायचा? रायगडावरील या सोहळयास बंदी घालणा-यांना आम्ही एकच इशारा देतो - रायगडावर आजही टकमक टोक आहे. शिवद्रोहींना टकमक टोकावरून ढकलल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही बाळासाहेबांनी दिला आहे.


--
MAHARASHTRA TIMES

No comments: