Monday, June 14, 2010

तरच मी तरेल..

बाबा ,


घर सोडत नाहीये मी

नव्या जगात पाऊल ठेवतेय



आजवर किनार्‍यावरुनच पाहिलीत

घोंघावती वादळं

हेलकावती जहाजं

आणि तटस्थ दीपस्तंभ देखील



रेतीत घर रचले , शंख शिंपले वेचले

तळाशी धडधडती माशांची स्पंदनं ऐकली



पुरे झालं असं पुळचट जगणं

किनार्‍यावर उभ्या,गंजल्या जहाजासारखं



समुद्राला आव्हान नाही दिलंय मी

पण, त्याला साद जरुर दिलीय

काल अवेळी आलेली भरती आठवते ?

मला प्रतिसाद दिलाय त्याने



आता मला निघायलाच हवं

जर तुमच्या डोळ्यांतल्या लाटांनी मला रोखलं

तर मी बुडेल..

तुम्ही बांध घालायलाच हवा

तरच मी तरेल..



नौकेत

एकटी असेन मी

नौकेबाहेर

सोबत असेल विशाल समुद्र

मला

हरवू पहाणारा

बुडवू पहाणारा



पण,

त्याच्याच साथीने शोधेल

नवे किनारे , नवे निवारे

कदाचित..नवीन समुद्र देखील !!



अन परत निघेल नवीन जगाच्या शोधात..

No comments: