Monday, June 14, 2010

विधीलिखीतच होतं..

पिंजर्‍यात होती मैना आणि जंगलात होता पोपट




वेळेने पंख पसरले अन ते भेटले



विधीलिखीतच होतं..



भावुक होत पोपट म्हणाला,चल उडून रानात जाऊ

मैना कुजबुजली,आत ये,दोघं पिंजर्‍यात राहू



पोपट म्हटला,अगं पण पिंजर्‍यात पंख पसरायला जागा कुठे ?

मैना म्हणाली,अरे पण तरंगत्या आकाशात बसायचं तरी कुठे ?



पोपट म्हटला,बरं चल रानगीत गाऊ

मैना म्हणाली,जवळ बस,भाषा शिकू



पोपट म्हणाला,गाणं कधी शिकवता येत नाही

मैना म्हणाली,मला तर एकही रानगीत माहीत नाही



दिवसेंदिवस प्रेम त्यांचं उत्कट होत होतं

तरी जोडीनं उडणं त्यांना शक्य नव्हतं



गजांआडून एकमेकांना बघायचे

मिलनाची निष्फळ इच्छा करायचे



पंख फडफडत ते गायचे..जिवलगा,जवळ ये,जवळ ये



अखेर एके दिवशी..



पोपट म्हटला निराशेने,पिंजर्‍याच्या बंद दाराची वाटे भीती,कसा येऊ ?

मैना म्हणाली खिन्नतेने,पंख माझे मॄत,नाही त्यात शक्ती,कशी येऊ ?



विधीलिखीतच होतं..

No comments: