Monday, June 14, 2010

तुला कळलंच नाही

राजा,तुला समुद्र कळलाच नाही




सार्‍या जगाने

झिडकारलेलं

टाकलेलं

स्वत:त सामावणार्‍या त्या अथांगाचा थांग तुला लागलाच नाही

राजा,तुला समुद्र कळलाच नाही



सार्‍या जगाला

जाळणार्‍या

पोळणार्‍या

तप्त गोळ्याला विझवणार्‍या त्या लाटांत तू भिजलाच नाही

राजा,तुला समुद्र कळलाच नाही



सार्‍या जगात

विहरणारे

कोसळणारे

ढग गोड करणार्‍या त्या खारटाचा स्वाद तुला कळलाच नाही

राजा,तुला समुद्र कळलाच नाही



कळलंच नाही तुला

त्याचं

उत्सुक नदीसाठी उफाळून येणं

हळव्या प्रेमींसाठी उचंबळून जाणं

गर्भार शिंपल्यांसाठी गलबलून येणं

जखमी किनार्‍यासाठी गहिवरुन जाणं



तुला कळलंच नाही

दर बारा तासांनी त्याचं चांदासाठी तळमळणं..

भरती ओहोटीत तीव्र मध्यम गाणं..



जाऊ देत राजा....

तुला 'मी' कळले नाही..

समुद्र काय कळणार ?

No comments: