Sunday, June 20, 2010

तू कुठे आहेस गा़लिब?

गा़लिब!
मला काहीतरी झालंय…
समुद्र पाहून
काहीतरी व्हायचं माझ्या छातीत…
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला…
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं…
पण आता
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड…
आता
झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं…
रात्री-बेरात्री ऊर उगाच भरून यायचा…
आता
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात.
इकडून तिकडे
तिकडून इकडे.
एवढंच काय गा़लिब!
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी…
आता कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत

No comments: