स्वप्नचित्र...
स्वप्नाळू रात्री, सहज एकदा, नदीतीरी बसले
ओढून घेता, पदर नभाचा,, एक रम्य दॄश्य दिसले
चांदणं होते, चमचमणारे, तीरावरी उतरलेले
पाण्यामधले, पोहते तारे, गालामध्ये हसलेले
आकाशीच्या पडद्यावरती, चालत होते, मन कुंचले
चंद्र सोळा चितारलेले, लख्ख दिवे लखलखले
रंगीत संगीत रेषा हलता, जरा जरासे पर हलले
फुलपाखरं, फडफडणारी, स्वप्नचित्र उमटलेले..
हिरवाईत होते, ससे गोजिरे, पांढरे कापूसवाणे
पिठूर चांदणे, माळून येता, शुभ्रतेत मी न्हाले
कुठे एकला, गात होता तो, चंदन.. गंधित गाणे
मधुर सूरांवर, सुगंधित कण, मंद मंद दरवळले
पलीकडे, त्या काठावरती, स्वप्नांची एक बाग फुले
बागेमधली, स्वप्नफुले ती, पाहताच मी फुलले
उगाच नाही, सांगत काही, स्वप्नामधे मी भुलले
चितारताना , नभावरी मी, पुन्हा पुन्हा गं रमले
No comments:
Post a Comment