अबोला
खूप वर्षांनी मला माझी शाळेची मैत्रिण भेटली. अगदी वाळवंटात पाणी, मिळाल्यावर जसा एखादा खूष होतो ना! अगदीच तशीच आनंदी मी झाले होते. तिला भेटून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आम्ही दोघी तब्बल दहा वर्षांनी भेटत होतो आणि ते ही एका अनोळखी शहरात. दहा वर्षात कधी संपर्कात आलो नाही परंतु लग्नानंतर दोघीही एकाच शहरात गेलो याची फार गंमत वाटली. मला तर फारच. दहा वर्षात हरवून गेलेल्या, सुकून गेलेल्या आमच्या मैत्रीला नवी पालवी फुटली.
एकमेकींची चौकशी केली. कसा, काय संसार सुरु आहे. सासर-माहेरच्या गप्पा गोष्टी. सगळं काही शेअर केल. सुधा कायम आनंदातच असायची. कधी तिचा चेहरा मी उदास पाहिला नाही. ना कधी मी तिच्या आवाजात निराशा, दुःख अनुभवलं नाही. कायम आनंदी. चैतन्याने रसरशीत अगदी शाळेमध्ये होती ना अगदी तशीच. माझ्या आपल्या कुरबुरी तिच्यापाशी कायम सुरुच असायच्या. आज असं झालं. तसं झालं. आदी पुन्हा रागवला. सासुबाईंना कळतच नाही वगैरे वगैरे. माझी टेप सुरुच. पण तिने कायम ऐकुन घेतल. फोनवर मला बोलायला कधी कंटाळा यायचा नाही आणि तिला ऐकायला.
शेवटी मलाच कसं तरी वाटल म्हणून मी या कुरुबुरी तिला सांगण सोडून दिलं. म्हणूनच की काय आमच खुप दिवसात बोलण झालं नाही.
आमच्या दोघींच्या ही लग्नाला एक-एक वर्ष झाली होती. पण दोघींच्या वृत्तीत कमालीचा फरक होता. सुधा कधीच सासरच्या कुरबुरी सांगत नसे. शेवटी न राहून मी तिला याबद्दल (कुरुबुरी ऍण्ड ऑल) विचारल. तेव्हा कळलं की ती आणि धीरज हे दोघेच राहतात. सासु सासरे गावाला असतात. मला तर बाई तीचा फार हेवा वाटला.
असो, एक दिवस तीने आणि मी ठरवलं दिवसभर भटकायच. दोघींनीच. पहिल्यांदाच आम्ही जास्तवेळ एकत्र राहणार होतो. ह्या प्लॅनसाठी मीच खरं तर पुढाकार घेतला होता. कारण मला जाम बोअर झालं होत.
शनिवारी सकाळी ९ वाजता भेटलो. आधी जरा बीचवर फिरायचे. मग तिथेच काही तरी खायचे. दुपार पर्यंत शॉपिंग, मग नाटक आणि संध्याकाळी एखाद्या प्रदर्शनाला जाऊन रात्री घरी जायचे.
ठरल्याप्रमाणे सकाळी भेटलो आणि दुपारचे नाटक पाहिले..सगळ काही ठरवल्याप्रमाणे होत होत. फक्त एक गोष्ट मला जाम खटकली. जाम वैताग आला.. ते म्हणजे तिचे सारखे येणारे फोन आणि सुरु असलेली एसएमएसगिरी..
ट्वि ट्वि एसएमएस ही रिंग टोन शंभरदा तरी ऎकली असेल. सारखे तिला एसएमएस येत होती आणि ती त्यांना रिप्लाय देत होती. याहून विचित्र गोष्ट म्हणजे तिला फोन ही यायचे...पण ती फोनवर बोलतच नसे...फक्त कानाला फोन लावून एकटीच हसत बसे..जणू नवरा तिच्याशी खुप रोमॅंटीक गप्पा मारतोय..माझ तर टाळकच फिरल. मी जरा चिडूनच तिला जाब विचारला. तर ती फक्त माझ्याकडे बघून हसली. सरळ प्रदर्शनाचा प्लॅन रद्द करुन मला सीसीडीमध्ये घेऊन गेली.
तिथे माझी आवडती कॉफी मागविली आणि म्हणाली, "गौरे हे एसएमएस आणि कॉल धीरजचेच सुरु होते."
मी वैतागले..."अगं एक दिवस धीरजला बायको शिवाय चैन नाही पडत का? धीर नाही का त्याला? बायको इतक्या वर्षांनी जुन्या मैत्रिणी बरोबर फिरायला गेले तर....किती हे पण यास काही मर्यादा...." मी बडबडले.
माझं बोलण जरा अती होत. पण तरिही मी बोलले कारण तिच वागणच तस होत. कोण पण वैतागेल. किती एसएमएस आणि किती ते फोन.
सुधा म्हणाली, "माफ कर ग गौरे, तुला असं पकवायच नव्हत मला. पण काय करु हे एसएमएस आणि तुला हे विचित्र वाटणारे फोन हा माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झालाय...माझा धीरज आता मुका झालाय"
"मुका?" मी उत्तरले. खरं तर ती काय बोलली हेच मला कळले नाही. ती पुढे बोलू लागली.
"हो ग. तो आता पहिल्यासारखा बोलू शकत नाही. त्याच तो भारदस्त आणि जीव घेणारा आवाज लोप पावला आहे. तो आता कधीच बोलू शकणार नाही."
हे ऐकून मला धक्का बसला होता. माझ्या पायाखालची जमिनच सरकली होती. ती पुढे सांगू लागली.
"धीरजला बोलायची फार आवड, खुप खुप बोलायचा माझ्याशी. अनेक विषयांवर. खुप सुंदर बोलायचा. तो बोलायला लागला की मी हरवून जायचे. आपल्या खास अंदाजात जेव्हा तो एखादी कविता म्हणायचा, तेव्हा तर हृदयाची शकले उडायची. पण आता त्याचा आवाजच गेलाय. एका अपघातात त्याच व्होकल कॉर्डच गेलाय..कायमचा..सर्व उपाय थकले. तो आता बोलूच शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सुरुवातीला तो खुप अपसेट असायचा पण....
आता त्याने यावर स्वतःच मार्ग शोधलाय...एसएमएस चा. त्याला जे काही बोलायचे आहे ते तो एसएमएसच्या मार्फत बोलतो. लांब असलो की आमची ह्या एसएमएसगिरीला ऊतच येतो. एसएमएसचा प्रत्येक शब्द वाचताना त्याचा आवाज कानात घुमतो. त्यामुळेच एसएमएस वाचताना मी आजही हरवून जाते जशी त्याचा आवाज ऐकताना हरवत होते. तो त्याच्या मनातील प्रेम पूर्वी एखादे गाणे गाऊन व्यक्त करायचा. पण आता ते शक्य नाही म्हणून तो मला फोन करुन गाणी ऐकवतो आणि आपले प्रेम व्यक्त करतो. हा माझ्यासाठी सर्वोच्च क्षण असतो ग!! यावेळी मला दुसर काहीच आठवत नाही. मी सार काही विसरुन जाते. तुला माहित आहे आता आमच घर खुप शांत झालय. दैवाने आमच घर म्हणजेच "सायलेन्स झोन"च केलय. कारण तो बोलत नाही...म्हणून मी ही बोलत नाही..फारसे..या सगळ्याचा तुला त्रास झाला यासाठी माफ कर. मी आपली पिकनिक स्पॉइल केली."
सुधाच्या तोंडून ही कहाणी ऐकून माझी पूर्ण वाट लागली होती. हे सगळ सांगताना तिच्या चेहर्यावर कुठलही दुःख नव्हत. निराशा नव्हती. पण मी.. मी मात्र पूर्ण तुटले होते. डोळ्यातील पाणी चेहर्यावरुन ओघळुन केव्हाच मानेवर आलं होत.
तिचे सांत्वन करण्याची माझी क्षमताच नव्हती आणि त्याची तिला गरज ही नव्हती.
उद्या फोन करीन अस सांगून मी तिथून निघाले...घराकडे धूम ठोकली.
आदी घरी आलाच होता.
माझा अवतार पाहून तो जरा अचंबीतच झाला.
मी हातातल सामान दारातच टाकलं आणि धावत जाऊन त्याच्या मिठीत जाउन हंबरडा फोडला.
आदीला काहीच कळलं नाही.
काळीज पिळवटुन टाकणार रडणं ऐकून त्याला काहीच सूचेना.
आधी जितक रडायचं तितकं रडून घेतल आणि मग सगळं बळ एकवटून आदीला म्हटल.
"आता मी तुझ्याशी कधीच भांडणार नाही आणि जरी भांडले तरी अबोला कधीच धरणार नाही, अगदी जीव गेला तरी."
माझ्या अबोला नसलेल्या भांडणाची जगावेगळी रित आदीच्या पचनीच पडली नाही. कारण भांडण म्हटल की अबोला हा आलाच ना!!!!
शेवटी त्यान माझ्या डोक्यावरुन हात फिरवून म्हटल "सेंटीमेंटल नही तू सेंटी कम मेंटल जादा है। म्हणजे आता मला शांतता नाहीच ना?"
मी डोळे पुसून...डोळ्यातून भगभगणार्या खोट्या रागानेच म्हटले "नाही. कधीच नाही..."
(आदीशी आदल्या दिवशी खुप भांडण केले होते आणि अनिश्चित काळासाठी अबोला ही धरला होता आणि हा अजून तरी शेवटचा ठरला आहे.)
No comments:
Post a Comment