जळगांवातील " आशा फौंडेशन " मार्फत 12,000 विद्यार्थीनींपर्यत पोहोचलेली कविता. यातून त्यांच्या सजकता व संस्कारांविषयी केलेला हा मुक्त संवाद
लक्षात ठेव पोरी.........
"""""""""""""""""""""""
लक्षात ठेव पोरी, तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा. ॥धृ॥
तुला घराबाहेर पाठवायला, मन आमचं धजत नाही.
पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं, असही वाटत नाही.
तळ हातावरच्या फोडाप्रमाणे, जपलय तुला काळजीने.
जाणिव ठेव त्याची आणि, झेंडा लाव तुझ्या यशाचा.॥1॥
उच्छल, धांदरट राहू नकोस, स्वप्नात उगीच गुंतू नकोस.
आरशापुढे उभं राहून, वेळ वाया घालू नकोस.
मोहात कसल्या पडू नकोस, अभ्यास करण्या विसरुं नकोस.
पैसे देवूनही मिळणार नाही, तुझा वेळ आहे लाख मोलाचा.॥2॥
मन जीवन तुझं कोरं पान, त्यावर कुणाचं नांव लिहू नकोस.
स्पर्श मायेचा की वासनेचा, भेद करण्यात तू चूकू नकोस.
मोबाईल-संगणक आवश्यकच गं, जाळ्यात त्यांच्या गुरफटू नकोस.
परक्यांवर विश्वास करू नकोस, अनादर नको करू गुरूजनांचा.॥3॥
देहाचं प्रदर्शन करण्यासाठी, संस्कार कपडे टाकू नको.
लाज वाटेल असं काही करण्यासाठी, चेहरा उगीच झाकू नको.
चूकांना येथे नसतेच कधी माफी,
गेलेली अब्रूही परत येत नाही.
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे, सतत डोळा असतो समाजाचा.॥4॥
असं विपरीत घडत असलं तरी, आमचा तुझ्यावर विश्वास आहे.
जीजाऊ, सावित्री आणि अहिल्या, किरण बेदीही तुझा आदर्श आहे.
युग आहे गुणांचं-स्पर्धेचं, हिमतीनं तू संघर्षही करशील.
मात्र, यशावरती स्वार होण्या, लगाम लागतो बेटा संयमाचा.॥5॥
लक्षात ठेव पोरी, तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा.
........प्रा.बी.एन.चौधरी.
No comments:
Post a Comment