भिमाशंकरच्या डोंगरात
शापीत रात्र आली
तुफानी पावसात
दरड कोसळली
जेथे होते एक गाव
ते गाडले गेले
कोरलेले माळीन नाव
क्षणात उध्वस्त झाले
चिली पिली पाखरे
मुकी आज झाली
हंबरणारी गाय वासरे
गोठयातच मेली
कुठे कुठे शोधू ती प्रेते
रक्ताचा चिखल झाला
भेट देतील सर्व नेते
म्हणे आता पंचनामा केला
असे कसे आज झाले
निसर्गाच्य कोपामुळे
कुणीच नाही उरले
हुंदकयात शब्द अडले
इथेच होते माळीन गाव
हसरे फुलते माणसाचे नाव
पुणे जिल्हा आंबेगाव तालुका माळीन गाव गाडले गेले टिव्हीवर पाहून मन हेलावले
या गावातील शेकडो मृताना माझी भावपूर्ण श्रद्धांजली..
Thursday, July 31, 2014
निसर्गाचा पंचनामा
Wednesday, July 23, 2014
आईची कैफियत
गुंठा गुंठा जमीन विकून आज
गोफ आलाय गळ्यात
पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला
उद्या रक्त येईल डोळ्यात
काळ्या आईच्या तळतळीचा
हा दागिना किती दिवस जाईल ?
हाच सोन्याचा हार
उद्या गळ्यातला फास होईल
निबंधक कार्यालयात
बहिणीचा हक्कसोड करून घेतला म्हणून
मनातल्या मनात
किती भयानक हसतो आपण ?
बापाचा अंगठा मिळावा म्हणून
आईचंही कुंकू पुसतो आपण
जन्माच्या सातबाऱ्यावर
बोजा चढला काय
आणि उतरला काय
जित्या माणसांच्या काळजात
बघा ना किती फेरफार झालाय !
सपरातून बंगल्यात आलो
म्हणजे काय शेणसड्याचं पुनर्वसन झालं ?
मळलेलं अंग झाकलं म्हणजे काय
सुरकुत्यांचं जागतिकीकरण झालं ?
ज्या दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं
त्याच दिवशी बघा ना
माणसाचं मार्केट किती डाऊन झालं !
भूक आहे तशीच आहे
पण भाकर बघा ना
कशी मॉलमधल्या काचेमध्ये करपून गेली
आभाळाएवढी तहान
एका बाटलीत झिरपून गेली
सायबर कॅफेत मांडीवर बसून
चिमण्या पिल्लांनी आईला
कसा मागायचा चुलीवरचा घास ?
अत्तराच्या बाटलीत सांगा ना
भरता येतो का मातीचा वास ?